SaraswatiAI
Empowering Education for All with AI
माझे वडील-एक कर्मयोगी!

आम्ही त्यांना प्रेमाने ‘भाऊ’ म्हणायचो.अतिशय कष्टात बालपण गेले असले तरी स्वतःच्या कर्तृत्वाने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने केवळ देशातच नाही तर परदेशातही त्यांनी स्वतःचे पेपर प्रसिद्ध केले. ते वनस्पतीशास्त्रज्ञ होते आणि शैवाल (शेवाल) मध्ये त्यांनी नाव कमावले. एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या ह्या नारायणाची चमक काही वेगळीच होती. कोणाच्याही आधाराशिवाय केवळ तल्लख बुद्धी आणि अविरत प्रयत्नाच्या जोरावर त्यांनी अनेक क्षेत्रांत यश मिळवले.

 

 महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरून शैवाल (शेवाल) गोळा करून त्यावर पेपर लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली. इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रोफेसर म्हणून मुंबई, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर येथे ते कार्यरत होते. हे करत असताना त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली.

बरं, हे सगळं चालू असतानाही त्यांनी घरात सुद्धा बारकाईने मुलांकडे लक्ष दिलं – अभ्यास, वळण, शिस्त यामध्ये कधीही कसर पडू दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांना म्हणाले, “सर, आपले चारही मुले इतकी हुशार कशी?”

आम्ही आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळे!

आमच्या घरी इतकी सुंदर बाग होती की रस्त्याने जाणारा थबकून नजर टाकल्याशिवाय पुढे जात नसे. संभाजीनगरमध्ये हापूसचा अस्सल देवगड आंबा केवळ तेच पिकवू शकले – ह्याच्या मागे होती एक शास्त्रज्ञाची बुद्धी.

जे काही करायचं ते शास्त्रशुद्ध! इतकं की त्यांनी “शास्त्रीय स्वयंपाक आणि आहार” नावाचं रेसिपीचं पुस्तक लिहिलं. प्रत्येक पदार्थ मोजून, मापून, कॅलरी तपासून, तीन वेळा करून, रंग आणि चव जसाच्या तसाच राहतो याची खात्री करून लिहिलं.

तीच गोष्ट बागकामशास्त्र पुस्तकाची!.

सगळ्यात गाजलेलं त्यांचं पुस्तक म्हणजे – “मोठं होण्याचा सोपा मार्ग”. खेड्यापाड्यांतील मुला-मुलींना मोठं होता यावं यासाठी प्रयत्न कसे करावेत, वर्तन कसं ठेवावं, आणि मार्ग कसा शोधावा याची सरळ-सोप्या भाषेत उदाहरणांसह.एक ह्या पुस्तकामुळे भाऊंनी कृतार्थता अनुभवली. अनेक लहान गावांमधून आभार प्रदर्शनाची पत्रं आलीच, पण काही पालक तर मुलांना घेऊन त्यांच्याच घरी त्यांचे आशीर्वाद घ्यायला आले. 

एक बोटॅनिस्ट म्हणून मिळवलेलं यश एकीकडे आणि ही कृतज्ञता दुसरीकडे. पण हे यश कधीच सोपं नव्हतं – त्या मागे होते अपार कष्ट आणि जिद्द.मी त्यांना नेहमीच “स्वयंप्रकाशित” मानते.
भाऊ – एक झाकलेला हिरा… पण त्याला पैलू त्यांनी स्वतःच पाडले! 🙏🙏

गीता चौकुळकर – कृतज्ञ मुलगी